अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 300 कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या

अहिल्यानगर -जिल्हा पोलीस दलातील चालू वर्षातील सुमारे 300 पोलीस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या गुरूवारी (4 जून) पोलीस मुख्यालयात पार पडल्या. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आयोजित केलेल्या बदली दरबारात प्रत्येक कर्मचार्‍याची भूमिका, गरज आणि पसंती जाणून घेत बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत काहींना मनासारखे पोलीस ठाणे मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर काहींना अपेक्षित ठिकाण न मिळाल्याने नाराजी आणि भावनिक क्षणही पाहायला मिळाले.

एका पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांकडून यापूर्वी तीन पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागविण्यात आले होते. बदलीपात्र कर्मचार्‍यांना गुरूवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्येक अंमलदाराशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर बदलीचे आदेश देण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपस्थित होते.

बदली प्रक्रियेत प्रथम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार आणि पोलीस हवालदार यांच्या बदल्या करण्यात आल्या. गुन्हे तपासाची जबाबदारी असलेल्या या अंमलदारांपैकी अनेक जण गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर शहर व परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तपास अंमलदारांची कमतरता निर्माण झाली होती. ही तूट भरून काढण्यासाठी काही तपास अंमलदारांच्या बदल्या त्यांच्या पसंतीपेक्षा रिक्त जागांचा विचार करून करण्यात आल्या. मात्र, काही कर्मचार्‍यांना अपेक्षित पोलीस ठाणे न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही महिला पोलिसांच्या डोळ्यांत अश्रूही दिसून आले. त्यानंतर पोलीस नाईक, पोलीस शिपाई आणि चालक यांच्या बदल्या करण्यात आल्या. या कर्मचार्‍यांच्या पसंतीचा मोठ्या प्रमाणावर विचार झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) बदली मिळावी, अशी अनेक कर्मचार्‍यांची इच्छा होती. अर्जातील पसंतीक्रमात एलसीबीचा समावेश असतानाही अधीक्षक सुदर्शन यांनी कोणालाही एलसीबीमध्ये बदली दिली नाही. त्यामुळे एलसीबीत जाण्याची अपेक्षा बाळगणार्‍या कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला. काही पोलिसांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले असले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या केवळ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles