प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मंगळापूर येथील एका जोडप्यावर नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी पत्नीचे भररस्त्यात अपहरण करून तिला अज्ञातस्थळी नेले असून, पतीवर वारंवार जीवघेणा हल्ला करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमोल उर्फ विनोद बाळासाहेब भोकनळ (रा. मंगळापूर, ता. संगमनेर) याने मागील वर्षी 12 जुलै रोजी आळंदी येथे स्वामिनी (पूर्वाश्रमीची स्वामिनी भास्कर कुटे) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह मुलीच्या कुटुंबियांना मान्य नसल्याने लग्नानंतर त्यांच्याकडून या जोडप्याचा पाठलाग सुरू होता. मागील महिनाभरापासून जीव वाचवण्यासाठी हे जोडपे परागंदा झाले होते. दरम्यान, 11 मे रोजी शिर्डीजवळील गोदावरी वसाहत परिसरात ओंकार सुभाष कुटे, राजाराम निवृत्ती पवार व त्यांच्या साथीदारांनी या जोडप्याला गाठले.
यावेळी स्वामिनीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी टाहो फोडला, मात्र हल्लेखोरांनी तिच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत तिला बळजबरीने गाडीत डांबून अज्ञातस्थळी पळवून नेले. या घटनेनंतर अमोलने शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीचा राग धरून हल्लेखोरांनी पुन्हा एकदा अमोलवर जीवघेणा हल्ला केला. संगमनेरमध्ये आपल्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, अमोलने नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलिसांकडे धाव घेत आपला जबाब नोंदवला आहे.
माझी पत्नी आणि माझा संपर्क तोडण्यात आला आहे. तिलाही जबर मारहाण करण्यात आली असून आमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. आम्ही दोघेही सज्ञान असून केवळ प्रेमविवाह केला म्हणून आम्हाला नाहक त्रास दिला जातोय. पोलिसांनी या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी. मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माझी व्यथा मांडणार आहे.
– अमोल भोकनळ (पीडित पती)


