हल्ला करणारे RSSचे लोक, अभिजित दिपकेंचा मोठा आरोप

जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीनंतर जे बाहेर आले, ती संघाचीच माणसे होती, असा आरोप आंदोलनकर्ते अभिजित दिपके मंगळवारी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल झाल्यानंतर केला. काल आमच्यावर हल्ला करणारे जे लोक समोर आले, ते संघाचेच होते. मात्र संघभूमीत आलो तरी आमचे आंदोलन शांततापूर्ण मार्गानेच होईल, असे दिपके यांनी नागपुरात उतरल्यावर स्पष्ट केले.

कायम अहिंसेच्या मार्गावर चालणार
जयपूरमधील कथित हल्ल्यानंतर थेट नागपुरात आंदोलनाची पुढील फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या आंदोलनाला नवे राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे. संघ मुख्यालय असलेल्या शहरात प्रवेश करतानाच दिपके यांनी हल्ल्यामागील व्यक्तींवर बोट ठेवत संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले. मात्र त्याचवेळी त्यांनी हिंसेऐवजी अहिंसेचा मार्ग कायम ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला.

शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, भरती प्रक्रिया आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवरून दिपके गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी देशभर आंदोलन उभारले असून जयपूरमधील घटनेनंतर या लढ्याला अधिक धार मिळाल्याचे दिसून येत आहे.

आमच्यासाठी हल्ले नवे नाहीत. आमच्यावर कुणी कितीही अटॅक करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हात उचलणार नाही. आम्ही सुरुवातीपासून सत्याग्रहाच्या मार्गाने चालत आलो आहोत आणि यापुढेही सत्याग्रहाच्या मार्गानेच आंदोलन करणार आहोत, असे दिपके म्हणाले.

गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. गांधी-आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हिंसेला हिंसेने उत्तर देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles