राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली. शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारने एक निर्णय घेतला की, आम्ही 48 हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे, यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नव्या तंत्रज्ञानाचा विचार करुन शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त केली. आज राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत आहोत. या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की, आपण 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2014 नंतर आपण शेती क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली. त्यासाठी जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे या योजना राबवल्या. महाराष्ट्रात लाखो शेततळी निर्माण झाली.अलीकडच्या काळात मी हेलिकॉप्टर वापरत नाही. पण मराठवाड्यात अनेक कोरडे जिल्हे आहेत. हेलिकॉप्टरमधून वरुन बघितल्यावर प्रत्येक शेतात तळं दिसतं. यंदाचे वर्ष हे अल निनोचे आहे. एकदाच पाऊस पडून नंतर काय गायब होतो. अशावेळी पिकांना पाणी देण्यासाठी ही शेततळी कामाला येतात. पूर्वी सिंचनाच्या योजनांसाठी वाट पाहायला लागायची. पण आता आपण ड्रिप इरिगेशन आणि इतर सिंचन योजनांची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आज आपल्याला शेती क्षेत्रात परिवर्तन करायचे असेल तर जागतिक बाजारपेठेचा विचार करावा लागेल. उत्पादन खर्च कमी झाल्यावरच आपली उत्पादकता वाढेल. त्यासाठी महाराष्ट्रात पुढच्या दोन-तीन वर्षात 50 हजार गट तयार केले तर गुंतवणूक क्षमता वाढेल. त्यामुळे पिकांचे प्रयोग करुन पुरक पिकं घेता येतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


