जिल्हा परिषदेतील रिक्त चतुर्थ श्रेणी पदे सरळसेवेने भरा; महिला परिचरांना पदोन्नतीत 25% आरक्षण द्या – कर्मचारी संघटनेची मागणी
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेची त्रैमासिक बैठक अहिल्यानगरमध्ये संपन्न
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेची त्रैमासिक बैठक अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात नुकतीच पार पडली
सभेच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब पठाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराव कदम,राज्य संघटनेचे अध्यक्ष मुकुंदराव तुरे, संदीप चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश गाडेकर, कार्याध्यक्ष अशोक काळापहाड,राज्य उपाध्यक्ष सागर आगरकर,कार्याध्यक्ष ऋषिकेश बनकर, अनिल येनगुल अंजली अमृत, संदीप विधाते, अनघा कुलकर्णी, अनिता साठे,विजय वाबळे, शाम शेळके, हैबत भांगरे, इंद्रभान गावडे, सुरेश माळवदे, किरण खेडकर, प्रकाश धोत्रे, राहुल साळवे, भरत शेंडगे, संजय दिवाण, शितल साठे,निर्मला गोरे, अश्विनी आगरकर, दादा बरबडे,ओंकार पानमळकर, संजय गायकवाड,पंकज बारवकर,योगेश नजन,ताराबाई साळुंके,सुरेश भोजणे आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून मंजुरी देण्यात आली. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष अशोक काळापहाड यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब पठाण यांनी शासन स्तरावरील मागण्या मांडल्या. जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील रिक्त असलेली चतुर्थ श्रेणीची पदे तातडीने सरळ सेवेने भरावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील महिला परिचरांना अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक या पदांसाठी 25% पदे पदोन्नतीसाठी राखीव ठेवावी.
परिचर पदावरून व्रणोपचारक पदावर पदोन्नती राबविण्यात यावी. तसेच या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून द्यावी. काही जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्याबत जिल्हा संघटनेने राज्यस्तरावर आवश्यक माहिती उपलब्ध करावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिनाथ मोरे यांनी केले. आभार सागर आगरकर यांनी मानले.


