कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा चौक येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून रस्ता रोको केल्याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान चिंचोली काळदात फाटा चौक येथे हे आंदोलन झाले. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करून श्रीगोंदा ते जामखेड आणि कर्जत ते मिरजगाव रस्त्यावरील वाहतूक अडवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची अडचण झाली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बळीराम गोपीनाथ काकडे यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून आमदार संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, ॲड. आकाश हाळनवर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंह शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव, ऋषीकेश काळदाते यांच्यासह इतर 100 ते 150 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक झंझाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे करत आहेत.


