ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ग्रामसभांवर बहिष्कार
संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
अहिल्यानगर : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन.पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचा अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने तीव्र निषेध नोंदविला आहे. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्य संघटनेने दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून आयोजित होणाऱ्या ग्रामसभांवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय हा शासनाच्या कामकाजास अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने नसून ग्रामपंचायत अधिकारी यांच्या जीवाताची व सुरक्षिततेची हमी , कामाचा अनावश्यक वाढलेला ताण व ग्रामसभा बैठकी दरम्यान निर्माण होणाऱ्या अनुचित परिस्थितीपासून संवर्गाचे संरक्षण या अत्यंत गंभीर बाबींचा पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे.
या राज्यव्यापी निर्णयाची अंमलबजावणी अहिल्यानगर जिल्ह्यातही करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन जो पर्यंत शासनस्तरावरून ग्रामसभेबाबत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत नाहीत व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सुरक्षितेबाबत स्पष्ट शासन निर्देश निर्गमित होत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच यापुढील काळात होणाऱ्या ग्रामसभेत सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी कामकाज करणार नाही असा ठाम निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला .
ग्रामपंचायत अधिकारी हा गावपातळीवर शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, जन्म-मृत्यू नोंदणी, विविध दाखले व अभिलेख, जनगणना, निवडणूक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, शासकीय अभियानांची अंमलबजावणी यासह अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर असतात.
अलीकडे ग्रामसभेत अनेक ठिकाणी वादविवाद, हुल्लडबाजी, शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की, मारहाणीसारखे प्रकार घडत आहेत, काही ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल करण्याची वेळ येत आहे, गावातील असामाजिक तत्वाकडून ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, सरपंच , पदाधिकारी यांच्याविरुद्ध खोट्या, तथ्यहीन व मोघम स्वरूपाच्या तक्रारी करण्यात येत असुन, त्यांच्यावर अनावश्यक प्रशासकीय व सामाजिक दबाव निर्माण केला जात आहे, अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात काही युवक सोशल मिडिया मधून ग्रामपंचायती बाबत कुठलीही शहानिशा न करता चुकीचे व्हिडिओ समाजामध्ये प्रसारित करत असतात, त्यामुळे ग्रामपंचायती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिमा मलिन होत आहे. ग्रामसभेत गावाच्या विकासाबाबत चर्चा न होता व लोकसहभागाचे व्यासपीठ न राहाता वैयक्तिक वाद, स्थानिक राजकीय संघर्ष आरोप – प्रत्यारोप, वैमनस्य, एकमेकांची ऊनेदुनी काढणे याचे केंद्र बनले आहे
अशा परिस्थितीत गावपातळीवर जनतेशी थेट संपर्कात राहून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, निर्भय आणि तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, शिवरे दिगर येथील दुर्दैवी घटना ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज पाटील यांनी सांगितले की, “शिवरे दिगर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. हा केवळ एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू नसून संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी संवर्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. लोकशाही प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर सुरक्षितता मिळणार नसेल, तर त्याबाबत शासन व प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.”
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, ग्रामसभांच्या वेळी निर्माण होणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीत शासनाने आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव, धमकी अथवा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप लगड, कायदे सल्लागार बापूसाहेब राजळे, नगर तालुका अध्यक्ष संपत दातीर, आनंद कांडेकर, तालुका सचिव रामदास सांगळे, वैभव वाघ, लेखापरीक्षक कृष्णा बडे, बाजीराव पवार, रूबेन वैराळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरे दिगर येथील घटनेचा निषेध करताना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी प्रभावी सुरक्षा यंत्रणा निर्माण करावी, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.


