सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दोन्ही शिवसेनेच्या लढाईत निर्णय कोणत्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपाचा होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह न्यायालयाकडून गोठवले जाणार असून शिवसेनेचे आमदार, खासदार त्यांच्याकडे टिकतील का? असा प्रश्न आहे. त्यांचे सर्व आमदार, खासदार भाजपामध्ये जातील, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले.
अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी निर्णायक टप्प्यावर आली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या लढ्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असे दिसते की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.
आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल. तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह न्यायालयाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.
दोन्ही शिवसेनेतील वादाचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह न्यायालयाकडून गोठवल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील. न्यायालयाने निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे, असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.


