अहिल्यानगर- महात्मा फुले कृषी विद्यापीठ समोरील नगर-मनमाड महामार्गावर काल सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वर जागीच ठार झाला. मधुकर गुलाब डोके (वय 48, काळाणेवस्ती रा. आढळगाव, ता.श्रीगोंदा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मधुकर डोके हे नगरकडून राहुरीकडे दुचाकीवरून जात असताना समोरून येणार्या कंटेनर (क्रमांक एमएच 04 एचवाय 3427) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील डोके यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, मधुकर डोके हे श्रीगोंद्यातून गुहा येथे त्यांच्या भाच्याकडे जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.


