अहिल्यानगर-केडगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता राहुल सिताराम शिलावंत (वय 35 रा. शाहुनगर, केडगाव) यांच्या अंगावर माजी नगरसेवक मनोज कोतकर याने वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात शिलावंत यांनी फिर्याद दिली असून मनोज कोतकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राहुल शिलावंत हे महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (16 जुलै) सायंकाळी ते त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना, मनोज कोतकर याने त्यांना फोन करून खंडोबा मंदिर परिसरातील विद्युत वितरण बॉक्सच्या बसवणीबाबत विचारणा केली. शिलावंत यांनी योग्य त्या स्वरूपात उत्तर दिले असतानाही, कोतकर याने रागाच्या भरात फोनवरूनच शिवीगाळ सुरू केली आणि ऑफिसमध्ये थांब, मी येतो असे धमकीवजा बोलून फोन कट केला. सुमारे दहा मिनिटांतच मनोज कोतकर हा पांढर्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून आला आणि वाहन भरधाव वेगात चालवत शिलावंत यांच्यावर चढवण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे सहकारी वैभव निकम व पोपट सातपुते यांनी त्यांना वेळीच बाजूला ओढून वाचवले. त्यानंतर कोतकर याने वाहनातून उतरून शिलावंत यांना जातीवाचक अपशब्द वापरून अपमानित केले व धमकी दिली. या संपूर्ण घटनेनंतर शिलावंत यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना घटनाक्रम सांगितला आणि दुसर्या दिवशी गुरूवारी (17 जुलै) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती अधिक तपास करीत आहेत.


