काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. पण ही टीका करत असताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दहशतवादी म्हटल्याची टीका केली होती. त्यांच्या याच वक्तव्याची दखल आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे.
मल्लिकार्जून खर्गेंना केंद्रीय निवडणुक आयोगाने नोटीस पाठवली असून निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गे यांना २४ तासात आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानानंतर भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. काँग्रेस अध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर कडक कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली होती. यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी (21 एप्रिल) रोजी तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य केले होते. AIADMK वर टीका करत असताना त्यांनी पंतप्रधान मोदींना दहशतवादी म्हटले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यावर नंतर स्पष्टीकरण देखील दिले होते. पण त्यांचे हेच वक्तव्य राजकीय वादाला कारण ठरले आहे. खर्गेंनी केवळ मोदींचा नाही तर १४२ कोटी भारतीयांचा अपमान केला आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. आता खर्गे निवडणूक आयोगाला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


