अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ ;सहकार विभागाचे एकाच वेळी तीन ठिकाणी छापे !

जामखेड तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने धडक कारवाई केली. तालुक्यात एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकत अवैध सावकारी करणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत कोरे धनादेश, खरेदीखते तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यात अवैध सावकारी सुरू असल्याबाबत प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्रसह तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, विभागीय निबंधक संभाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रीय अधिकार्‍यांचा समावेश करून, जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समन्वयाने पथके तयार करून सदरची कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाचे 16 अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस दलाचे 6 अधिकारी-कर्मचारी अशा 22 जणांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दोन संशयित ठिकाणांवर छापे टाकले.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. छाप्या दरम्यान कोरे धनादेश, खरेदीखते, आर्थिक नोंदी असलेल्या वह्या, तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाने तालुक्यातील सर्व नागरिकांना अवैध सावकारीविरोधात सहाय्यक निबंधक कार्यालय, जामखेड येथे आवश्यक कागदपत्रासहा तक्रार दाखल केल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी व चौकशी सुरू आहे. सदर पडताळणीअंती पुढील आवश्यक ती कारवाई केली जाईल. नागरिकांनी आर्थिक गरजेसाठी शक्यतो राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था अथवा परवानाधारक सावकार यांच्याकडूनच कर्ज घ्यावे.
– दिलीप तिजोरे, सहाय्यक निबंधक, जामखेड.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles