Tuesday, November 11, 2025

…तर थेट राज्यपालांकडे राजीनामा द्यायला तयार, विधीमंडळातील रमीच्या डावावर माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण

विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सभागृहात लक्षवेधी चालू असताना कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत (ऑनलाइन रमी) असल्याचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यावरून कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, कोकाटे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत कोकाटे राजीनामा देतील का? याबद्दल तर्क व्यक्त केले जात होते. मात्र कोकाटे यांनी राजीनामा दिलेला नाही. तसा विचारही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच सभागृहातील कथित ऑनलाइन रमीच्या डावावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की “मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला.”

माणिकराव कोकाटे म्हणाले, “तो फार किरकोळ विषय आहे. मात्र, त्याची इतकी चर्चा का होतेय तेच मला कळत नाहीये. मी याआधीच त्यावर खुलासा केला आहे. तुम्हा लोकांना ऑनलाइन रमी हा काय प्रकार आहे ते माहिती आहे का? असा गेम खेळताना तुम्हाला तुमचा फोन नंबर व बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करावी लागते. हा गेम आल्यापासून ते आतापर्यंतची माहिती तुम्ही तपासा. माझा नंबर किंवा बँक खातं अशा गेमशी संलग्न आहे का ते तपासा. मी तुम्हा प्रसारमाध्यमांना माझा फोन व बँक खाते क्रमांक देतो. तुम्ही चौकशी करा.”

“हा गेम सुरू झाल्यापासून आतापर्यंत मी एक रुपयाचीही रमी खेळलेलो नाही. मुळात मला रमी हा गेम खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करून माझी बदनामी करणं चुकीचं आहे. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर असे खोटे आरोप केले आहेत. त्यांना मी कोर्टाच खेचल्याशिवाय राहणार नाही.”

माणिकराव कोकाटे म्हणाले, “मी सभागृहात रमी खेळलो असं वाटत असेल तर याप्रकरणी तपास करावा. मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी यामध्ये दोषी आढळलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या नागपूर अधिवेशनात (हिवाळी) यावर निवेदन दिलं. तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करेन.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles