Saturday, November 15, 2025

आकाशात रुग्णाचा जीव वाचवणारी अहिल्यानगरची डॉक्टर! ३५ हजार फूट उंचीवर विमान प्रवाशाला वैद्यकीय मदत

आकाशात रुग्णाचा जीव वाचवणारी अहिल्यानगरची डॉक्टर!
३५ हजार फूट उंचीवर विमान प्रवाशाला वैद्यकीय मदत
सहकुटुंब सहलीला जाताना आपण आपले मूळ व्यवसाय विसरून जातो. रोजच्या धावपळीतून विश्रांती म्हणून तर अशा सहली असतात. मात्र जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मूळ भूमिकेचा दुसऱ्यासाठी उपयोग करण्याची वेळ येते, तेव्हा आपण कसे वागतो हे महत्वाचे. बऱ्याच वेळा अशा वेळी आपल्या आसपास काय घडते, याकडे मला काय त्याचे, किंवा नको नसती झंजट असे म्हणत दुर्लक्ष करणारेही अनेक असतात. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर मधील डॉ. सिमरनकौर वधवा यांनी विमानातील सहप्रवासाला आपत्कालीन परिस्थितीत कौशल्याने मदत केल्याचे एक उदाहरण समोर आले आहे.
गोवा येथून कौटुंबिक सहलीहून परतणाऱ्या अहिल्यानगरमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा यांनी गोवा ते हैदराबाद या इंडिगो विमानाच्या प्रवासात एका महिलेचे प्राण वाचवले. ३५ हजार फूट उंचीवर घडलेल्या या आपत्कालीन प्रसंगात त्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल विमान कंपनीनेही त्यांचे आभार मानले आहेत.
गोव्यातून कोलकात्याला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या पत्नीला अचानक दम्याचा अटॅक आला. तिला तीव्र श्‍वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला, ती अर्धवट शुद्धीत होती, अंग थरथरत होते. दिवसभर न खाल्ल्यामुळे आणि साखर न घेतल्यामुळे तिची अवस्था अधिकच बिघडत चालली होती. या घाईच्या प्रसंगी इंडिगोच्या क्रू मेंबर्सनी तत्काळ ऑक्सिजन सिलिंडर व मास्क उपलब्ध करून दिले, मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती.
या वेळी विमानात काहीच रांगा पुढे बसलेल्या डॉ. सिमरनकौर वधवा यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे येत त्या महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी त्या महिलेची नाडी, रक्तदाब तपासला. तिच्या पतीचे समुपदेशन करत त्याला धीर दिला. महिलेचा दम्याचा अटॅक आणि शक्य असलेला हायपोग्लायसेमिया लक्षात घेता त्यांनी क्रू मेंबर्सकडे साखर टाकलेली काळी कॉफी मागवली. ती महिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असतानाही डॉ. वधवांनी तिला काळजीपूर्वक कॉफी पाजली, खोलवर श्‍वास घेण्यास लावत आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले.
सुमारे पंधरा मिनिटांचा हा प्रसंग अत्यंत भयावह होता. परंतु डॉ. वधवा यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे सगळे सुरळीत झाले. कारण अशा वेळी नातेवाईक आणि सहप्रवाशी यांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. साधे उपाय करणेही सुचत नाही.
शेवटी ती महिला पूर्णपणे शुद्धीवर आली आणि हैदराबाद येथे विमानातून स्वतः उतरण्यास सक्षम ठरली. या प्रसंगामुळे विमानातील संपूर्ण प्रवासी आणि कर्मचारी भारावून गेले. इंडिगोच्या क्रू आणि संबंधित महिलेच्या पतीने डॉ. सिमरनकौर वधवा यांचे आभार मानले. इंडिगो एअरलाईन्सनेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून या घटनेचे वर्णन करत डॉ. वधवा यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले आहे.
डॉ. सिमरनकौर वधवा या सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांची पत्नी आहेत. करोना महामारीच्या काळातही त्यांनी घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सेवा कार्य केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles