मराठा समाजाने २९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘मुंबईकडे मोर्चा’ निघणार नाही. या मोर्चाचा मार्ग कसा असेल याची माहिती जरांगे पाटलांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये दिली. पत्रकारांनी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील यांनी ‘मुंबईकडे मोर्चा’ची सविस्तर माहिती दिली. ‘या वेळेस आधीपेक्षा पाचपट संख्येने मराठा समाज मोर्चामध्ये सामील होणार आहे. अहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट, कल्याण आणि पुढे चेंबूर मार्गे हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार. शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढचा प्रवास सुरू करणार’ अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
‘गेल्यावेळी लोणावळा मार्गे मोर्चा काढला होता. मात्र यंदा आम्ही शिवनेरी गडावर नतमस्तक होऊन माळशेज घाट, कल्याण, ठाणे, चेंबूर मार्गे आझाद मैदानात पोहोचणार आहोत. कल्याणचा मार्ग जवळ असल्याने तो मार्ग निवडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून मोर्चा जात आहे. पण कोणाला लक्ष्य करण्याचा आमचा उद्देश नाही. आम्ही अशा प्रकारे राजकारण करत नाही. आम्ही छक्के पंजे खेळणाऱ्यांपैकी नाही, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.
पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांनी भावनिक आवाहन केले. ‘आम्ही मोर्चासाठी सरळ मार्ग निवडला आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घ्यायचे आहे. शिवनेरीची माती कपाळी लावायची आहे. मी माघारी परतेन की नाही ठाऊक नाही, म्हणून मी माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईन. माझं शरीर साथ देत नाही. मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. मराठ्यांच्या अंगावर शंभर टक्के गुलाल फेकायचा आहे. मी परत येईन की नाही याची शाश्वती नाही,’ असे जरांगे पाटील म्हणाले.


