शिक्षक बँकेची डिजिटल व ऑनलाइन बँकिंग सेवा वर्षअखेरपर्यंत सुरू होणार – तापकीर
शिक्षक बँकेची रविवारी १०६ वी वार्षिक सभा
अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ६ कोटी ६८ लाख ०९ हजार १९ इतका निव्वळ नफा झाला असून त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना पाच टक्के प्रमाणे लाभांश वार्षिक सभेनंतर देण्यात येणार असून वर्षाअखेर बँकेतर्फे ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकिर व उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी दिली. तसेच गेल्या वर्षभरापासून बंद असलेली एटीएम सेवा आजपासून पूर्ववतरित्या सुरू करीत आहोत असेही ते म्हणाले. शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तापकीर पुढे म्हणाले की अहवाल सालात बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ न करता शैक्षणिक कर्जाचा व्याजदर ०.४० ने कमी करून ७.५० इतका केला आहे,घरकर्ज व वाहन तारण कर्ज याचा व्याजदर पुर्वी प्रमाणेच ७.९० असून इतर कर्जाचा व्याजदर ८.४० असा आहे. एवढया कमी व्याजदारामध्ये कर्ज वितरण करणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे.गुरुमाऊली मंडळ सत्तेत आल्यापासून झालेले निर्णय फक्त आणि फक्त सभासद हित डोळयासमोर ठेऊन घेतलेले आहेत. आज पर्यंत झाला नाही असा आदर्श कारभार गेल्या ८ वर्षांमध्ये संचालक मंडळाने केला आहे. सभासदांना ४४ लाख रूपये कर्ज वितरण करणारी शिक्षक बँक ही एकमेव बँक आहे. मार्च अखेर बँकेच्या ठेवी १५३३ कोटी आहेत. हा सभासद व ठेवीदार यांनी संचालक मंडळावर दाखविलेला विश्वास आहे. सभासद कल्याण निधी मधून सभासद व त्यांच्या पाल्यांना पारितोषिके, रू.२५ हजार पर्यंत वैद्यकीय मदत व रू.३ हजार अंत्यसेवा मदत दिली जाते. सभासद कर्ज निवारण निधीमधून मयत सभासदांचे रु.४४ लाखापर्यतचे कर्ज माफ केले जाते. कुटुंब आधार निधी मधून मयत सभासद कर्मचारी यांचे वारसास रू.१५ लाख आर्थिक मदत व सेवानिवृत्त होणाऱ्या बँकेच्या सभासदांना व कर्मचाऱ्यांना रु.११ हजार कृतज्ञता निधी दिला जातो. सभासदांना अशा प्रकारची भरीव मदत दिली जाते.
संचालक मंडळाने रविवार दि.२०/०७/२०२५ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद कर्ज निवारण निधी नियमावली व सभासदांची मागणी तसेच बँकेच्या व्यवसायात प्रगती होणेसाठी बँक कार्यक्षेत्र वाढविणे करीता पोटनियम दुरूस्ती सुचविलेली आहे. रिझर्व बँकेने केलेले सूचनेनुसार सदर सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच बँकेच्या आधुनिक व वाढत्या कामकाजामुळे कर्मचारी संरचनेत सुधारणा करणे आवश्यक असल्याने हा बदल सुचविलेला आहे. तसेच काही शिफारसी केलेल्या आहेत त्यास मंजूरी मिळण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली आहे. माहे आक्टोबर २०२२ पासुन गुरुमाऊली मंडळ २०१५ चे मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालक मंडळ बँकेच्या सत्तेत असून सभासद हिताचे निर्णय घेऊन कर्ज व्याजदर ७.५०, ७.९० व ८.४० टक्के तर सभासद कायम ठेवीवर ७ टक्के व्याजदर देऊन सरासरी १.०१ % चे फरकाने कारभार केलेला आहे. यामध्ये बँकेचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, कर्मचारी यांचे मोठे योगदान असून १०६ वर्षाचा महाकाय आर्थिक वटवृक्ष म्हणजे प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या बैंकेची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२०/०७/२०२५ रोजी होत आहे. गेल्या काही वर्षामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होणाऱ्या गोंधळाची परंपरा संचालक मंडळाने केलेल्या सभासद हिताच्या कारभारामुळे खंडित झाली आहे. पुर्वी पाच मिनीटात संपणारी सभा आम्ही नऊ नऊ तास चालविली आहे. उद्याची सभा देखील आम्ही दीर्घकाळ चालविण्याचा संकल्प केला आहे. सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी संचालक मंडळाची आहे. सभासदांनी आपले प्रश्न मांडावेत आणि त्यावर साधक बाधक चर्चा होऊन वार्षिक सभे मध्ये योग्य ते निर्णय व्हावेत यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. या प्रसंगी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, राजेंद्र कुदनर गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे, संघाचे जिल्हाध्यक्ष बबन दादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे व विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रल्हाद भालेकर ,संतोष आंबेकर ,प्रदीप दळवी, जितू रहाटे, बाळासाहेब कापसे ,राजेंद्र निमसे, प्रदीप चक्रनारायण
इतर मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेस चेअरमन श्री.बाळासाहेब तापकिर, व्हा.चेअरमन श्री.योगेश वाघमारे, संचालक सर्वश्री संदीप मोटे, रामेश्वर चोपडे, बाळू सरोदे, कैलास सारोक्ते, निर्गुणा बांगर, रमेश गोरे, आण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहिज, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, सुर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी कराड, कारभारी बाबर, गोरक्षनाथ विटनोर, महेंद्र भणभणे, कल्याण लवांडे, सरस्वती घुले रविकिरण साळवे विठ्ठल काकडे, सचिन नाबगे, आबासाहेब सूर्यवंशी, सुयोग पवार
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सूर्यकांत जगताप उपस्थित होते.
तर सात पेक्षाही कमी टक्के दराने कर्ज पुरवठा करणार – दुसुंगे
शिक्षक बँकेला शेड्युल बँक करण्यासाठी बँकेचे कार्यक्षेत्र वाढविणे आवश्यक आहे,त्यानुसार संचालक मंडळाने वार्षिक सभेत ठराव सुचविला आहे, बँकेचे कार्यक्षेत्र वाढल्यानंतर आपली बँक शेड्युल बँक होणार असून शेड्युल बँक झाल्यानंतर सभासदांना सात पेक्षाही कमी व्याज दराने कर्ज वितरण करण्याचा संकल्प असल्याचे गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी सांगितले.


