महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग;पाथर्डी तालुक्यातील 39 गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाथर्डी तालुक्यात झंझावाती दौरा करून प्रचाराला मोठी चालना दिली. या दौऱ्यात तालुक्यातील तब्बल 39 गावांमध्ये त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून गावागावांतून “अक्षय कर्डिले यांना आमदार करायचे” असा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रचारादरम्यान महिलांपासून युवकांपर्यंत सर्व घटकांचा सहभाग दिसून आला, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
यावेळी बोलताना आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, “राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. गावातील गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत विकासासाठी मतदान करणे गरजेचे आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय कर्डिले यांना निवडून द्यावे.
त्या पुढे म्हणाल्या की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सहकार्याची भूमिका घेतली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेत राहणारे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे नेते होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले.
राजळे यांनी पुढे सांगितले की, जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. दूध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गाय खरेदीसाठी कर्जरूपी मदत करण्यात आली. शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले, ज्याचा फायदा आजही नागरिकांना होत आहे.
या दौऱ्यात महापौर ज्योतीताई गाडे, सुभाष बर्डे, पुरुषोत्तम आठरे, संभाजी पालवे, बाळासाहेब अकोलकर, संतोष शिंदे, वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे, पोपट कराळे, दुर्योधन लोंढे, गौतम कराळे, अण्णासाहेब वांडेकर, मधुकर वांडेकर, धीरज मैड, रामकिसन वांडेकर, सुधाकर वांडेकर, मच्छिंद्र खाडे, रामेश्वर फसले, बाजीराव हजारे, शरद जाधव आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनानंतर अक्षय कर्डिले यांची जबाबदारी आता जनतेने स्वीकारली आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
ग्रामस्थांनी पुढे सांगितले की, स्वर्गीय कर्डिले यांनी जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून वांबोरी चारीचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली. या विकासकामांच्या बळावरच पाथर्डी तालुक्यातील 39 गावांनी अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे.
एकूणच, या झंझावाती दौऱ्यामुळे पाथर्डी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून अक्षय कर्डिले यांच्या बाजूने जनसमर्थन वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles