अहिल्यानगर जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत

जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

अहिल्यानगर, दि.२० एप्रिल :- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य निधी’ हा महत्त्वाचा आधार ठरत आहे. सदर आर्थिक वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाख रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, कागदविरहित अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. तसेच सामंजस्य करार आणि लोकसहभागातून निधी उभारणी (क्राउड फंडिंग)च्या माध्यमातून सहकार्य करणारी रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि दाते यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

मुख्यमंत्री साहाय्य निधीच्या कार्यपद्धतीत करण्यात आलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता वाढली असून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक साहाय्य मिळत आहे.

कॉक्लियर इम्प्लांट (वय २ ते ६ वर्षे), हृदयरोग, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हात, गुडघा प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले (बर्न) रुग्ण आणि विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री साहाय्य निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार अधिक सुलभ होणार आहेत.

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. याच कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८४४ रुग्णांना ३१ कोटी १९ लाख ७३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कक्षाचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लक्षणीय संख्येने रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याला सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”असे आवाहन मुख्यमंत्री साहाय्य निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles