बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करताच ‘प्रहार’मध्ये बंड;प्रहार जनशक्ती पक्षाच्याच जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात दाखल होऊन बच्चू कडू यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला आहे, आम्ही त्यांच्या या निर्णयासोबत नाही. हा निर्णय घेताना त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या भवितव्याचा बळी त्यांनी दिला आहे असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला. बच्चू कडू यांचा निर्णय आम्हास मान्य नसून आम्ही त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे बोधने यांनी स्पष्ट केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तसेच प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन केल्याचे जाहीर केले. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन करत असताना महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसह परभणी जिल्ह्यातील कुठल्याच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही किंवा साधी विचारणा पण केली नाही असा आरोप बोधने यांनी केला आहे.
बच्चु कडू यांच्या पक्ष विलनिकरण्याच्या एकतर्फी निर्णयाने मागील ८-१० वर्षापासून पक्षात काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजकीय नुकसान झाले. बच्चु कडू यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणाऱ्या व वेगवेगळे आंदोलनांमध्ये स्वतःवर गुन्हे दाखल करून घेणाऱ्या, रक्ताचं पाणी करून पक्ष वाढविण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिला आहे असा संताप बोधने यांनी व्यक्त केला आहे.बच्चु कडू यांनी जरी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन केला असला तरीही प्रहार जनशक्ती पक्ष परभणी जिल्हा हा शिवसेना शिंदे गटांमध्ये विलीन होणार नाही आणि त्यांच्यासोबत कामही करणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वच सदस्यांनी घेतल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख बोधने यांनी दिली. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक सावली शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.
या बैठकीमध्ये कोअर कमिटीच्या सदस्यानी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून पक्षाचे तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख व शाखाप्रमुख यांच्याशी भविष्यातील राजकीय दिशा ठरविण्याबाबत चर्चा करून त्यांचे मत जाणून घ्यावे व त्यानंतर कोअर कमिटीची बैठक होऊन भविष्यातील राजकीय दिशा ठरविण्याबाबत निर्णय घ्यावा असे या बैठकीत ठरले. पुढील निर्णय दोन-तीन दिवसात जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्था जिल्हाप्रमुख केशव जाधव, पक्षाचे जिल्हा चिटणीस रामेश्वर पुरी, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर जाधव, उद्धव गरुड, संजय वाघमारे, नितीनकुमार वैराळ, धर्मेंद्र तुपसमुद्रे, मनोज माने इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles