कर्तव्यनिष्ठ अधिकारी बाळासाहेब पोकळे यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
अहिल्यानगर शहर प्रतिनिधी –
अहिल्यानगर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष व जनसंपर्कात कुशल अधिकारी बाळासाहेब पोकळे यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती झाली आहे. दीर्घकाळापासून पोलीस सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या पोकळे यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत जनतेचा व वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले बाळासाहेब पोकळे यांच्या या कामगिरीचं तालुक्यात कौतुक होत आहे.
पोकळे यांनी आपल्या सेवाकाळात गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक शिस्त, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी दाखविलेली तत्परता आणि अचूक निर्णयक्षमता यामुळे ते ओळखले जातात. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कोरोना काळात रस्त्यावर उतरुन कठीण परिस्थितीत नागरिकांची सेवा केली. राज्य राखीव पोलीस दल, दौंड येथून सुरू झालेला प्रवास पुढे मुंबई पोलीस आणि आता अहिल्यानगर पोलीस दलापर्यंतचा उल्लेखनीय राहिला आहे.
नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागातही बाळासाहेब पोकळे यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. राज्य राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून सण – उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात काही वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांची बदली अहिल्यानगर येथे झाली. येथे आल्यानंतर त्यांनी ‘बीडीडीएस’च्या माध्यमातून कर्तव्य पार पाडले. सध्या ते अहिल्यानगर भरोसा सेल येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती केली.
या पदोन्नतीबाबत सहकारी अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. “कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांमुळेच पोकळे यांना ही पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्याकडून आगामी काळातही नागरिकांसाठी उत्तम सेवा अपेक्षित आहे,” अशी प्रतिक्रिया वरिष्ठांनी व्यक्त केली.


