बाजार समितीवर बेलकर-सालके यांची बिनविरोध निवड
खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम तुकाराम बेलकर तर उपसभापतीपदी संदीप लक्ष्मण सालके यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी गटाचे स्पष्ट बहुमत आणि समन्वयाच्या भूमिकेमुळे ही निवड कोणत्याही निवडणुकीशिवाय एकमताने पार पडली.
मावळते सभापती किसनराव रासकर व उपसभापती किसनराव सुपेकर यांनी इतर संचालकांना संधी देण्याच्या भूमिकेतून १२ मार्च रोजी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. इच्छुक संचालकांनी सक्रिय हालचाली करत आपापली भूमिका मांडली होती.
या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी संचालकांमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. संचालकांना ढवळपुरी येथील अंकुर व्हॅली येथे सहलीसाठी पाठवून आपापसात चर्चा करून निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, सहलीदरम्यान ठोस एकमत होऊ शकले नाही.
अखेर गुरुवारी सकाळी सर्व संचालकांना पारनेर येथील खासदार लंके यांच्या संपर्क कार्यालयात बोलावण्यात आले. येथे प्रत्येक संचालकाची भूमिका समजून घेतल्यानंतर सभापतीपदी गंगाराम बेलकर व उपसभापतीपदी संदीप सालके यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
यानंतर अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. सभापतीपदासाठी गंगाराम बेलकर व उपसभापतीपदासाठी संदीप सालके यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सचिव सुरेश आढाव यांनी निवड प्रक्रियेस सहकार्य केले.
१८ सदस्यीय संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व खासदार नीलेश लंके समर्थकांचे स्पष्ट वर्चस्व असून १२ सदस्य राष्ट्रवादीचे, ५ शिवसेना ठाकरे गटाचे व १ सदस्य अजित पवार गटाचा आहे. त्यामुळे पदाधिकारी निवड बिनविरोध होणे अपेक्षित होते.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित सभापती गंगाराम बेलकर यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समितीचा विकास साधण्याची ग्वाही दिली. उपसभापती संदीप सालके यांनीही पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा आदर्श पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
निवड जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर खासदार नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला.
समाप्त


