महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषण केल्याच्या प्रकरणात अशोक खरात या भोंदूबाबाला अटक करण्यात आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. अशोक खरात या भोंदूची पाद्यपूजा करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. तसंच रुपाली चाकणकर यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोपही झाले होते. अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात प्रतिक्रियाही दिल्या होत्या. एवढंच नाही तर रुपाली चाकणकरांनी विशिष्ट दिवशी अनामिका कापून अघोरी पूजा केली होती असेही दावे केले होते. दरम्यान या सगळ्या गदारोळामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं. रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरातशी कुठलाही आर्थिक व्यवहार केलेला नाही असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
रुपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणात ईडी चौकशी आणि एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि चौकशीत झालं ते सांगितलं. अशोक खरात प्रकरणात जी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे त्यांनीही रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारले. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे अशोक खरातने श्री शिवनिका संस्थानतंर्गत श्री ईशान्येश्वर मंदिर बांधले. या श्री शिवनिका संस्थानच्या विश्वस्त मंडळात रुपाली चाकणकर यांचाही सहभाग होता. अशोक खरातच्या दरबारात कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी, उद्योजकांनी हजेरी लावली होती, त्याची माहिती समाज माध्यमातून पुढे येत गेली. खरात प्रकरणात चाकणकर यांचा नेमका संबंध काय, याविषयी कुतूहल वाढले असताना रविवारी रुाली चाकणकर या एसआयटीसमोर उपस्थित राहण्यासाठी नाशिक येथे आल्या होत्या. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जेव्हा चौकशीला बोलवलं गेलं तेव्हा आम्ही उपस्थित राहिलो होतो. याआधी अनेकदा चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत हे मला आवर्जून सांगायचं आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला बोलावलं गेलं तेव्हा चुकीच्या बातम्या आल्या. माझी बहीण आणि माझा पुतण्या यांनाही बोलवलं गेलं होतं. सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या आल्या. आम्ही तपास यंत्रणेला आम्ही पूर्ण सहकार्य केलं. चार ते साडेचार तासांची चौकशी झाली. मी पहिल्या दिवशी जे सांगितलं तेच सांगते आहे. खरात प्रकरणात आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. कोणत्याही जमिनीत आम्ही पार्टनर नव्हतो. त्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत. तपास अहवाल समोर आला की काय प्रश्न विचारले गेले चौकशीत हे समोर येईल. आर्थिक व्यवहारासंबंधीही प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहार झालेला नाही. त्यामुळे ईडीला काही प्रश्न पडले नसावेत. खरात प्रकरणात जी एसआयटी स्थापन झाली, त्यांचे प्रश्न वेगळे होते. ईडीचे प्रश्न वेगळे होते. यापुढेही सहकार्य लागलं तर आम्ही करायला तयार आहोत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
गुवाहाटीचा जो फोटो तु्म्ही सगळ्यांनी पाहिला आहे तो नीट पाहिला तर कळेल माझ्या कुटुंबासह खरातचं कुटुंबही तिथे आहे. आम्ही खरातसह प्रवास केला नव्हता. अशोक खरात तिथे दर्शनासाठी त्याच्या कुटुंबासह आणि त्याच्या काही लोकांसह पोहचला होता. माझ्या कुटुंबाने यापूर्वी तिथे दर्शन केलं नव्हतं त्यावेळी आमचा भाव असा होता की गुरु बरोबर जर दर्शन करता आलं तर बरं. त्या भावनेतून आम्ही पुण्याहून आमच्या कुटुंबासह गेलो होतो. खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आला होता. दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा अध्यात्मिक भाव मनात होता. खरातला १७ तारखेला अटक केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे अनेक क्षेत्रातले अनेक लोक त्याला गुरु मानत होते, त्याच्या दर्शनासाठी जात होते. त्यामुळे आम्हीही ती भावना ठेवली होती. तो एक श्रद्धेचा भाग होता.


