शहरात विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्या दोघांवर महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल
परवानगीशिवाय फ्लेक्स लावल्यास कठोर कारवाई करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – शहरात विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रेमदान चौक व नागापूर पुलाजवळ दोन ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्स प्रकरणी महानगरपालिकेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. परवानगीशिवाय फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्यास कठोर कारवाई करणार आहे. फौजदारी व दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया केल्या जातील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
सावेडी प्रभाग कार्यालयाचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार यांनी फिर्याद दिली आहे. अहिल्यानगर – मनमाड रोड, प्रेमदान चौक, कोहिनुर मॉलसमोर, सावेडी येथे रस्त्याच्या मध्यभागी लाईटच्या खांबाला मंगलमुर्ती वास्तु प्रा. लि. या नावाचा साधाराण फ्लेक्स बोर्ड बेकायदेशीर लावण्यात आलेला होता. तसेच नागापुर येथे पुलाच्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी लाईटच्या खांबाला आकाश कातोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा फ्लेक्स बोर्ड लावला होता. सदर फ्लेक्स बोर्ड काढून जप्त करण्यात आलेले आहेत. सदर फ्लेक्स बोर्ड लावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात विनापरवाना फ्लेक्स लावू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. अनधिकृत फ्लेक्सवर कारवायाही सुरू आहेत. यापुढे विनापरवाना फ्लेक्स आढळल्यास फौजदारी व दंडात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.


