महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर आधारित एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकात विविध लेख आहेत. या लेखांमध्ये उद्धव ठाकरेंच्या लेखाचाही समावेश आहे. देवेंद्र फडणवीस प्रामाणिक राजकारणी आहेत असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला आहे तसंच त्यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या वघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि वयाच्या २७ व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून बनले. ही उपलब्धी त्यांच्या प्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष देते. त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि कायदेशीर, आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतं. त्यांनी कायद्याची पदवी, व्यवसाय, व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनात डिप्लोमा मिळवला आहे. त्यांचे पुस्तक अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे त्यांच्या जटिल विषयांना साध्या भाषेत मांडण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्र स्थानी ठेवूनच काम केलं. नझूल जमिनीच्या नूतनीकरणासारख्या प्रश्नांवर त्यांनी तीव्र लढा दिला आणि कामगार तसंच झोपडपट्टीवासीय यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. २०१४ मध्ये वयाच्या ४४ व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांनी राजकीय कारकिर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत. देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच २०१४ ते २०१९ आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठी पुस्तकं लिहिली, ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे. त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता, ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर झाले. या पार्श्वभूमीवरही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणं राबवली. देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकिर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सदी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला आहे. फडणवीस यांच्या २०१४-२०१९ च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या, ज्यामुळे पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली.
फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपातील प्रतिमा ही गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्राला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहेत. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणाचं यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो ही मनःपूर्वक शुभेच्छा.


