शेवगाव – शेवगाव तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी शेवगाव येथे एमआयडीसी उभारण्याची मागणी सन 2022 पासून सातत्याने करण्यात येत आहे.
याच मागणीसाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजीवजी भोर, अॅड. शिवाजीराव काकडे व सौ. हर्षदा काकडे यांनी मंगळवार, दि. 18 रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी एमआयडीसीच्या निर्मितीबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिली.
अॅड. काकडे म्हणाले, शेवगाव शहरापासून जायकवाडी धरण जवळ असल्याने पाणीपुरवठा तसेच वीज उपलब्धतेची सुविधा येथे सहज होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी नगर दक्षिणेतील मोठी औद्योगिक वसाहत उभारण्याची मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर व सौ. हर्षदा काकडे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
शेवगाव तालुक्याने जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी गोदावरी काठची 29 गावे दिली असून, या त्यागामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यामुळे शेवगावला औद्योगिक विकासाच्या माध्यमातून न्याय मिळाल्यास येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या अर्थचक्राला मोठी चालना मिळेल.
त्यामुळे शासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन एमआयडीसीसाठी लागणारी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे अॅड. काकडे यांनी सांगितले.


