अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख , महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, पक्षात ठेकेदार स्वार्थासाठी जमा झाल्याचा आरोप

राहाता: जिल्ह्यातील शिवसेनेत (शिंदे गट) केवळ १ टक्का सामाजिक कार्यकर्ते असून ९९ टक्के ठेकेदार स्वार्थासाठी जमा झाल्याचा आरोप करत पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख (उत्तर विभाग) विमल पुंडे यांनी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. पुंडे यांच्यासह शहर संघटिका कमल नरोडे, उपशहर प्रमुख उर्मिला लोळगे, विभाग प्रमुख रुपाली महाडिक व प्रिती शिंदे यांनीही राजीनामा पाठवला आहे.

त्यांच्या राजीनामा पत्राने पक्षात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, निष्ठा, विचार आणि तत्वांवर उभा राहाणारा शिवसैनिक हाच पक्षाची खरी ताकद वाढवतो. संपर्कनेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिर्डी येथील आढावा बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. तो त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी होता. सतत भांडणाऱ्या काही लोकांनी पक्षाची प्रतिमा मलीन केली आहे.

पक्ष संघटना कार्यकर्त्यांची प्रतिमा, त्यांचे समाजकरण, जनसेवा आणि शिस्त यामुळे मोठी होते. गटबाजी, अहंकार आणि स्वार्थाने नाही. मी सन १९९२ ते आजपर्यंत गेल्या ३४ वर्षापासून एकाच शिवसेनेच्या झेंड्याखाली काम करीत आली आहे. माझी आर्थिक परिस्थिती नसतांना साखरसम्राटांच्या विरोधात मी निवडणुका लढविल्या. नगरसेविका, महिला आघाडी शहर प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आदी विविध पदांवर काम केले. योग शिक्षिका म्हणून काम करतांना महिला व मुलींच्या आरोग्यासाठी गेली २५ वर्षे काम करत आहे.शिर्डी बैठकीत घडलेला गोंधळ हा न पटणारा आहे. आम्ही असे प्रकार यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. अशा घटना यापुढे नेहमी घडणार आहेत. त्यामुळे आम्हा महिलांना या शिवसेना संघटनेत राहून काम करणे अवघड आहे. यापुढे आम्ही महिला शिवसेनेच्या सर्व बैठका, उपक्रमांवर बहिष्कार टाकत आहोत, शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आहोत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंचा विचार शिल्लक राहीला नाही. पक्ष वाढीसाठी पक्षाकडून भरीव आर्थिक पाठबळ दिले जात आहे. पण त्यातून पक्ष वाढला नाही मात्र गटबाजी आणि राडेरोडे खूप वाढले. पक्षात १ टक्का सामाजिक कार्यकर्ते आणि ९९ टक्के ठेकेदार पदाधिकारी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरुन आलेल्या, अनेक अपात्र व्यक्ती स्वार्थासाठी जमल्याने तेथे काम करण्याची अपेक्षा ठेवणे मनाला त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी स्वतःचा स्वाभिमान जपत शांतपणे दूर राहणे हा योग्य निर्णय असू शकतो, असे नमूद करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

या पत्रावर महिला आघाडीच्या उत्तर जिल्हाप्रमुख विमल पुंडे, शहर संघटिका कमल नरोडे, उपशहर प्रमुख उर्मिला लोळगे,विभाग प्रमुख रुपाली महाडिक, प्रिती शिंदे आदींच्या सह्या आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles