Saturday, November 15, 2025

आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली ! …म्हणून निवडणूक आयोगानं रविवारी पत्रकार परिषद घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगानं आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत, आम्ही कोणताही भेदभाव करत नाहीत. लोकांची दिशाभूल करणं हा संविधानाचा अपमान आहे, निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण बंद करा असं यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं. रविवार असताना आयोगानं पत्रकार परिषद घ्यायची का घाई केली? असा सवाल यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतांची चोरी चव्हाट्यावर आणली आहे . आयोगाने भाजपाने जी स्क्रिप्ट दिली ती खाली मान घालून वाचली आहे. पत्रकार परिषदेमधून आयोगानं नाटक आणि देखावा केला आहे, आज पुन्हा एकदा ते तोंडघशी पडले आहेत. आयोगाला आज कोणीतरी सांगितलं असेल की आज राहुल गांधी यांची बिहारमध्ये यात्रा आहे, ती थांबवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी वस्तुनिष्ठ उत्तर दिले नाही, त्यामुळे मतांची चोरी झाली हे सिद्ध झाले . राहुल गांधी यांनी मतांची चोरी केल्याचा आरोप केला , तेही पुराव्यानिशी केला . ही सगळी माहिती निवडणूक आयोगाच्या दस्तावेजामधील आहे .

दरम्यान मतदार स्थलांतररित होत असल्यानं नाव येत नाही, असा दावाही या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं केला होता, याला देखील सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हा निवडणूक आयोगाचा बेशरमपना आहे, असा घणाघात यावेळी निवडणूक आयोगावर सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या या आरोपांनंतर आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles