शेवगाव – पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांना पितृशोक…माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन
अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, गंगापूरचे माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर (वय ८०) यांचे निधन. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते आजारी होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांशी त्यांचे नातेसंबंध आहेत. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचे ते वडील होत.
१९७७ पासून ते राजकारणात आले. १९९५ ते १९९७ या काळात ते युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. अपक्षांचे नेते म्हणून त्यावेळी त्यांची ओळख होती. १९८० मध्ये त्यांनी काँग्रेसपक्षाकडून गंगापूरची निवडणूक लढविली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी विमानतळावरच डोणगावर यांना उमेदवारी जाहीर केली होती. आधीचा उमेदवार बदलून डोणगावकर यांना संधी दिल्याने ही निवडणूक गाजली. त्यांनी ती जिंकत ३७ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर बरीच पदे आणि राजकीय स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली.


