माजी आमदार प्राजक्त तनपुरे मनाने आमच्याबरोबर जोडले गेल्यास आनंदच होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही अजूनही वेळ गेलेली नाही, तनपुरे यांनी भाजपला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेच्या व्यासपीठावर तनपुरे उपस्थित राहणार का, याबद्दल आणि तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या वाटचालीबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आज, शुक्रवारी राहुरीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी तनपुरे मनाने आमच्याबरोबर आले तर त्यांचे आनंदच होईल असे सांगितले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक समविचारी नेते मनाने जोडले गेले आहेत. जर तनपुरे आमच्या सोबत जोडले गेले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल.
तत्पूर्वी सभेत बोलताना सभापती राम शिंदे यांनी तनपुरे यांना थेट पाठिंबा देण्याची आवाहन केले. शिंदे म्हणाले, तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याबद्दल त्यांचे आभार. परंतु अजूनही ते द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसते. अजूनही वेळ गेलेली नाही. मतदानापर्यंत त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा.
भाजप नेत्यांनी व्यक्त केलेल्या थेट प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेदवारी अर्ज दाखल न करून त्यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली. मात्र त्यांनी उघडपणे भाजपसोबत जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे.
.तसेच तनपुरे यांचे मतदारसंघातील समर्थकही, तनपुरे यांच्याकडून कोणती सूचना मिळते याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे समर्थक कोणत्याच बाजूच्या प्रचारात दिसत नाहीत. त्यातूनच तनपुरे यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. तनपुरे यांच्या समर्थकांची अवहेलना होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन माजी खासदार विखे यांनी भाजप कार्यकर्त्यांना यापूर्वीच केले आहे.


