12 टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक, नगरमध्ये पतसंस्थेच्या चेअरमन व संचालकांवर गुन्हा

राहुरी तालुक्यातील एका पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी 12 टक्के व्याजदराने आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संबंधित पतसंस्थेचे चेअरमन व संचालकांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पुंजाराम शेगजी पाटील (वय 68, रा. पुरुषोत्तम नगर, राहुरी) हे मुळा पाटबंधारे उपविभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुरी शहरातील शितल कॉम्प्लेक्स, येवले इस्टेट येथे कार्यरत असलेल्या विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या पतसंस्थेने ठेवींवर 12 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या राहुरी येथील शाखा बंद असून बारागाव नांदूर (ता. राहुरी) येथे शाखा सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आकर्षक परताव्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पुंजाराम पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील यांच्या नावाने वेळोवेळी एकूण 13 लाख 4 हजार रुपयांच्या मुदतठेवी करण्यात आल्या. मात्र, ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर संबंधित रक्कम परत मिळण्यासाठी त्यांनी पतसंस्थेच्या चेअरमन व संचालकांकडे वारंवार पाठपुरावा केला. आज देतो, उद्या देतो अशी आश्वासने देत संबंधितांनी पैसे परत केले नाहीत, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी आर्थिक अपहार करून फिर्यादीची 13 लाख 4 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच मुदतठेवी केलेल्या इतर ठेवीदारांनाही त्यांच्या ठेवींची रक्कम परत न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चेअरमन गणेशराव रमेश गोपाळे, संचालक शंतनु रमेश गोपाळे तसेच मेघा भगवान सोनवणे उर्फ मेघा गणेश गोपाळे (सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 783/2026 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 120(ब), 34, 406, 409, 420 तसेच इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles