डचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला.दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी असे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत. विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेले असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे.
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या धक्कादायक घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक आणि नागपूरची पथके आज घटनास्थळी दाखल होऊन आश्रमशाळेची पाहणी करणार आहेत. विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाकडून नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, सर्पदंशानंतर उपचार घेत असलेल्या आणखी तीन विद्यार्थिनींना तातडीने अँटी व्हेनम देण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. चौकशीत निष्काळजीपणा किंवा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळल्यास दोषी कोणताही असो, जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय. दरम्यान या घटनेवर सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही तीव्र दुःख व्यक्त केला असून, उपचाराधीन विद्यार्थिनींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र आश्रमशाळेतील निष्पाप विद्यार्थिनींच्या सुरक्षेत नेमकी चूक कुठे झाली, तीन जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग का आली, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


