अहिल्यानगर-शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी नवीन ठेकेदार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी कचरा संकलनासाठी नवीन संस्था नियुक्त होऊन त्यांच्यामार्फत कचरा संकलन व वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे उपनगराच्या भागात कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांची संख्या घटल्याने कचरा संकलनाचे नियोजन कोलमडले आहे. केडगाव व कल्याण रस्ता परिसरात आठ दिवसांनी, तर सावेडी उपनगरातील काही भागात चार तर काही भागात आठ दिवसांतून एकदा घंटागाडी येत आहे. परिणामी, नागरिक रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत.
सध्या कचरा संकलन करणार्या संस्थेची मुदतही संपत आली आहे. नागरिकांचा रोष पाहता जुन्या संस्थेला मुदतवाढ न देता नवीन संस्था नियुक्तीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन, मनपाच्या आगामी निवडणुकीपूर्वी नवीन ठेकेदार नियुक्त होण्याची शक्यता आहे.


