पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारातील अंदाजे 150 कोटी रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी कारखाना साईटवरून गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांच्या पंचनाम्यात हा प्रकार समोर आला असून आता पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणात फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीने या गुन्ह्यातील मुख्य मुद्देमाल असलेल्या कारखाना मशिनरीचा पंचनामा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार तपासणी अधिकार्यांनी कारखाना साईटची पाहणी शुक्रवारी सायंकाळी केली आणि पंचनामा केला. यावेळी या ठिकाणची मशिनरी आरोपींनी इतरत्र हलविल्याचे दिसून आले. यातील आरोपींवर पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर जानेवारी महिन्यांत गुन्हा दाखल झाला होता. आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर अहिल्यानगर सत्र न्यायालयाने काही काळासाठी स्थगिती दिली होती.
2 जुलै रोजी सत्र न्यायालयाने स्थगिती उठवत आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावत तपासाला सामोरे जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर तपासाला गती मिळाली असून तपासणी अधिकारी पोलिस निरीक्षक समिर बारवकर यांनी गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. त्या अनुषंगाने तपासाचे काम सुरू असून मुख्य मुद्देमाल मशिनरी कारखाना साईटवरून आरोपींनी गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन सरकारी पंचांच्या समक्ष तसा पंचनामा पोलिसांनी केला आहे. कारखाना साईटवरील पेट्रोल पंप देखील गायब केला असून त्याचा स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे. हा मुद्देमाल जप्त करण्याची मागणी कारखाना बचाव समितीने पोलिसांकडे केली आहे. यावेळी बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या गुन्ह्याच्या गैरव्यवहाराची व्याप्ती सुमारे 400 कोटी रुपये असून राज्य सहकारी बॅकेचे अनंत भुईभार, अनिल चव्हाण हे दोन वरिष्ठ अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडूरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकु नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले हे प्रमुख आरोपी आहेत.


