गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनं जोर धरला. ५ जुलै रोजी मराठी विजय मेळाव्याला दोन्ही भाऊ एकत्र आले अन् राज्याच्या नव्या राजकीय युतीची चाहूल लागली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली. शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा झाली? याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेय. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, महाराष्ट्राच्या मनात आहे ते नक्की होईल, असे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यामध्ये मनसे आणि शिवसेना युतीवर भाष्य करण्यात आले.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.” दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेसोबतच्या युतीवर वारंवार भाष्य केले जातेय, पण राज ठाकरेंकडून अद्याप अधिकृत यावर कोणताही प्रतिक्रिया येत नसल्याचे दिसतेय. पाहूयात मुलाखतीत राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
लोकांचा रेटा आहे की तुम्ही ( राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राजकीय दृष्ट्या एकत्र यावं, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “ठीक आहे, आता २० वर्षांनी एकत्र आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असाही त्याचा भाग नाही. पण मी जे काही म्हटलं की मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी आणि मराठी आस्मितेसाठी जे-जे करण्याची गरज आहे, ते-ते करण्याची माझी तयारी आहे”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीबाबत केलं.


