योध्येतील राम मंदिरात रामभक्तांनी दिलेल्या देणगीचा अपहार झाला असून याप्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. यावरून देशभरातील रामभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील रामभक्तांनी रविवारी, ५ जुलै रोजी दादर येथील कबुतरखाना येथे असलेल्या मारुती मंदिराजवळ आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली.“संपूर्ण देशात गोंधळ, सर्वासामान्यांबद्दल अनास्था ओढावली आहे. कोणाला कोणाचं उत्तरदायित्वच राहिलेलं नाही. याच्या मुळावर आघात करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण देश हा आज भाजपाच्या अंमलाखाली आहे. राम मंदिर हे भाजपाच्या सत्तेचं मूळ आहे ज्यात आम्हीही सहभागी होतो. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं, त्यात अनेक शिवसैनिक होते. देशातील तमाम हिंदू सहभागी होता. तो काळही आठवत असेल. आपल्या माध्यमातून हे सारं दृष्य जनतेच्या मनात खोलवर रुजलेले आहे. कारसेवकांवरील अत्याचार, गोध्रामधील दंगल, अहमदाबादमधील दंगल, मुंबईतील बॉम्बस्फोटमध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं”, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी शेअर केली.
पुढे भाजपावर टीका करताना ते म्हणाले, “राम मंदिरासाठी हे आंदोलन सुरू होण्याआधी भाजपाचे संपूर्ण देशात दोनच खासदार होते. गांधीवादी समाजवाद हा त्यांनी अंगिकारलेला कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सोडून ते हिंदूत्त्वाकडे वळले आणि राम मंदिराच्या कार्याला हात घातला आणि आज याचं भांडवल करून ते देशात अमर्याद सत्ता उपभोगत आहेत. अशा या भाजपाच्या काळात राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या गोष्टीमुळे चर्चिला जातोय, हे दुर्दैवं आहे. आज राजकीय दरोडेखोरी सुरू आहे, आमदार- खासदार चोरले जात आहेत, त्याला ऑपरेशन नाव दिलं जातंय मग आता ऑपेरशन राम मंदिर भाजपा करतंय का हा मुद्दा आहे. या बातम्या दाखवल्या जात असतील-नसतील, पण चोरी तर होतेय. राम मंदिरावर दरोडा टाकला गेलाय, त्याबाबत पुरावेही दिले आहेत. त्या चोरीचा पैसा पक्ष फोडण्याकरता वापरला जात आहे, असं म्हटलं जातंय, हे फार गंभीर आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा. तसं आज मी म्हणतोय की आता हिंदू माफ नहीं करेगा, असं म्हणायची वेळ आली आहे. जे जे मंदिर लुटत आहेत, त्यांना हिंदू जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली.


