पाईप लाईनमुळे सातबाऱ्यावर इंडियन ऑईलचे नाव नोंदविण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
नोंद झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा – माजी जि.प. सदस्य संदेश कार्ले यांचे तहसीलदारांना निवेदन
अहिल्यानगर – नगर तालुक्यातील अकोळनेर, खंडाळा परिसरासह विविध गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीतून इंडियन ऑईल कंपनीची पाईपलाईन गेलेली आहे. या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांना यापूर्वी अत्यल्प पीक नुकसानभरपाई देण्यात आली असून, आता त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ सदरी ऑईल कंपनीचे नाव नोंदविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सातबाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत ऑईल कंपनीचे नाव दाखल करू नये, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार ग. दि. कुलथे यांना देण्यात आले आहे.
अनेक गावांतून पाईपलाईन
नगर तालुक्यातील अकोळनेर येथील ऑईल डेपोसाठी नांदगाव, शिंगवे नाईक, इस्लामपूर, निंबळक, देहरे, विळद, पिंपरी घुमट, हमीदपूर, निमगाव वाघा, अकोळनेर, चास, खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळकी, इसळक, निंबळकसह अनेक गावांतील शेतजमिनीतून पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांना सुमारे चार ते सहा हजार रुपये प्रति गुंठा या प्रमाणात पीक नुकसानभरपाई देण्यात आल्याचे कार्ले यांनी सांगितले. मात्र, पाईपलाईन टाकण्यास शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यावेळी पाईपलाईन गेलेल्या क्षेत्राची सातबाऱ्यावर कोणतीही नोंद केली जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. तसेच केवळ संबंधित 18 मीटर क्षेत्रात बोअरवेल, विहीर व पक्के बांधकाम करण्याबाबत निर्बंध राहतील, असे जनसुनावणीदरम्यान स्पष्ट करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
मात्र, सध्या तहसील कार्यालयाकडून संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ सदरी इंडियन ऑईल कंपनीचे नाव नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
‘आज नाव नोंदविले तर उद्या अडचणी वाढतील’
इंडियन ऑईल कंपनी ही व्यावसायिक संस्था असून ती स्वतःचा नफा-तोटा पाहते. पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांना आधीच अत्यल्प मोबदला मिळाला आहे. अशा परिस्थितीत सातबाऱ्यावर कंपनीचे नाव दाखल झाल्यास भविष्यात जमिनीच्या वापरावर निर्बंध येतील, अशी भीती आहे.
आज पाईपलाईनसाठी नोंद होईल, उद्या चौकी उभारण्याची मागणी होईल आणि त्यानंतर रस्ता करण्याची आवश्यकता सांगितली जाऊ शकते. तसेच शेतीच्या कामासाठीही कंपनीचा ना-हरकत दाखला घ्यावा लागेल, अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा
सातबारा उताऱ्यावर कंपनीचे नाव दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा प्रत्यक्ष नोंद केल्यास त्यास नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची तीव्र हरकत राहील. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदेश कार्ले यांनी दिला आहे.
दरम्यान, खंडाळा, अकोळनेर भागातील भूगर्भातून पेट्रोलियम पाईपलाईन गेल्यानंतर काही ठिकाणी भूगर्भातील पाण्याला पेट्रोलसदृश वास येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालातून निष्पन्न झाल्याचा दावाही कार्ले यांनी केला आहे.
सातबाऱ्यावर नोंद करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि पूर्वीच्या जनसुनावणीतील अटींची तपासणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, भारत फलके, साहेबराव काडेकर, विकास कांडेकर, प्रसाद कांडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


