Ahilyanagar crime :तोतया डिवायएसपीकडून 33 लाखांची फसवणूक ;दोन पोलीस कर्मचार्‍यांची फसवणूक

अहिल्यानगर -स्वतःला निलंबित पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस कर्मचार्‍यांची 33 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी गजानन सखाराम बोडखे (वय 36 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शाम अजिनाथ साळुंखे व त्याचा भाऊ आकाश साळुंखे (रा. केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी बोडखे आणि त्यांचे सहकारी विशाल प्रभाकर पायघन (रा. केडगाव) हे अहिल्यानगर रेल्वे सुरक्षा बल येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शाम साळुंखेशी परिचय झाला. त्याने स्वत: डीवायएसपी असल्याचे व काही कारणास्तव निलंबित असल्याचे सांगून सध्या प्लॉटींगचा व्यवसाय करत असल्याचे भासविले. त्याने बोडखे व पायघन यांना गुंतवणुकीची ऑफर दिली. भोर गावाबाहेर मेडिकल कॉलेज होणार्‍या जागेवरील दोन प्लॉटसाठी प्रत्येकी 20 लाख रूपये गुंठ्याप्रमाणे एकूण 40 लाख रूपये लागतील, असे आमिष त्याने दाखवले. त्यावर विश्वास ठेवून दोन्ही पोलिसांनी बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेतील शाम साळुंखे याच्या बँक खात्यावर आरटीजीएसव्दारे टप्प्याटप्प्याने एकूण 40 लाख रूपये वर्ग केले. यासाठी त्यांनी बँकेतून मोठे कर्जही काढले.दरम्यान पैसे घेऊनही प्लॉटची खरेदी करून न दिल्याने आणि नंतर विचारणा केली असता, केवळ वेळकाढूपणा केल्याने फसवणूक झाल्याचे बोडखे व पायघन यांच्या लक्षात आले. साळुंखे याने काही दिवसांनी 7 लाख रूपये परत केले, परंतु उर्वरित 33 लाख रूपये देण्यास टाळाटाळ केली. या प्रकारानंतर, आपल्याला प्लॉट न देता विश्वासघात करून फसवणूक करण्यात आल्याची खात्री झाल्यावर बोडखे व पायघन यांनी पोलिसांत धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात शाम साळुंखे आणि त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाम साळुंखे हा डिवायएसपी नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles