ए. टी. यु. जदीद उर्दु प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पदावरील निलंबन मागे घेण्यासाठी संस्थेच्या चेअरमनने पाच लाखांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी नासिर ख्वाजालाल खान (वय 51, रा. समीरनगर, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (20 जुलै) तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नासिर खान यांच्या फिर्यादीनुसार, 15 एप्रिल 2025 रोजी त्यांना पोस्टमनमार्फत एक रजिस्टर पत्र मिळाले. हे पत्र उघडून पाहिले असता, त्यामध्ये त्यांना मुख्याध्यापक पदावरून निलंबित करण्याचा आदेश होता. त्यानंतर त्यांनी या आदेशाविरोधात न्यायालयात आव्हान दिला.
यामुळे संस्थेच्या पदाधिकार्यांना राग आला. त्यानंतर 9 जुलै 2025 रोजी, फिर्यादी तहसिल कार्यालयात कामासाठी गेले असताना, चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहिम (रा. झेड. एम. टॉवर, सिटी लॉन शेजारी, सावेडी) यांनी त्यांना थांबवून काही बोलायचे असल्याचे सांगून, तहसिलसमोरील एका हॉटेलमध्ये बोलावले.
तिथे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुला पुन्हा कामावर घ्यायचे असल्यास पाच लाख रूपये द्यावे लागतील. तू जर पैसे दिले नाहीस तर तुझी बदनामी करून तुला कायमचे घरी बसवू, तुझ्यावरचे आरोप मीच घातले आहेत. स्वीकृत्त सदस्य वहाब सय्यद उमर (रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांनीही त्यांना धमकी दिली की, पैसे दिले नाहीत तर यापेक्षा अधिक त्रास दिला जाईल आणि बदनामी केली जाईल.
नासिर खान यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी संस्थेचा चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहिम आणि स्वीकृत्त सदस्य वहाब सय्यद उमर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे करीत आहेत.


