सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. उद्योगांना कुठलाही त्रास होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा त्यांनी सुपा औद्योगिक वसाहतीमधील मिंडा इंडस्ट्रीज लि. येथे आयोजित बैठकीत घेतला.
या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, व्यवस्थापक अशोक बेनके, श्याम बिराजदार, विभागीय अधिकारी गणेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुंजाळ, तहसीलदार गायत्री सौंदाणे, एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे, सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सोमनाथ दिवटे, विद्युत विभागाचे रमेश पवार, तसेच उद्योजक अनुराग धूत, प्रकाश गांधी, जयद्रथ खकाळ, हरजीत सिंग वाधवा व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. आशिया म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस विभागाने समन्वयातून कार्य करावे. क्षेत्रात पोलिसांची गस्त वाढवावी. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. अतिरिक्त दाबाचा वीजपुरवठा आवश्यक असलेल्या उद्योगांचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत. औद्योगिक रस्त्यांवर पावसाचे पाणी उद्योग परिसरात जात असल्याने निचऱ्याची कामे तातडीने करावीत. पथदिवे सतत कार्यरत राहतील यासाठी दक्षता घ्यावी. अहिल्यानगर व सुपा औद्योगिक क्षेत्रातील ट्रक टर्मिनल व कामगार रुग्णालयाच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.
नेवासा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती, पुरेशा दाबाने वीजपुरवठा, मुबलक पाणी, अतिक्रमणांचे हटवणे या बाबींचे निराकरण संबंधित विभागांनी समन्वयातून करावे. उद्योगांना आवश्यक परवाने ‘मैत्री पोर्टल’वरून मिळू शकतात, त्यामुळे या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी केले.


