गुणवाडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश
अहिल्यानगर, दि. १३ : तालुक्यातील गुणवाडी तलावातून येत्या १६ फेब्रुवारीपासून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पाण्याचे हे आवर्तन १२ दिवसांचे असणार आहे.
तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची सातत्याने मागणी होत होती. मात्र, यासाठी कालवा सल्लागार समितीची मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आवर्तनाच्या काळात पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.


