देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरुन देशवासियांना संबोधित केले. या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. या टीकेला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले आहे.
पटोले म्हणाले, “पंतप्रधान जेव्हा देशाला संबोधित करतात, तेव्हा ते देशहिताच्या मुद्द्यावर किंवा संकटाच्या वेळी बोलतात, असे मला आजवर वाटत होते. पण २०१४ पासून आजपर्यंतच्या प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदी यांनी १५० हून अधिक वेळा काँग्रेस पक्षाचे नाव घेतले आहे. ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पटोले पुढे म्हणाले, “मोदी बोलत असताना मी मोबाईलवर पाहत होतो. अनेक लोक त्यांच्यावर ‘फेकू’ आणि ‘मी बोलू शकत नाही’ अशा शब्दांत टीका करत होते.” ते म्हणाले, “देशाचा पंतप्रधान वारंवार खोटे बोलत असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आणले तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते मंजूरही झाले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, २०२४ मध्ये जनगणना करून मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल. आता २०२६ साल सुरू झाले तरी जनगणनेचा विषय अद्याप प्रलंबित आहे.”


