लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर
शपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध हा देशाच्या प्रगतीस अडथळा असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात परिवारवादी राजकारणावर निशाणा साधत, अशा पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना संसदेत पोहोचू द्यायचे नाही, असा आरोप केला. तसेच 21व्या शतकातील महिलांना सर्व घडामोडींची जाणीव असून त्या योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी केवळ काँग्रेसच नव्हे तर तृणमूल काँग्रेस , द्रविड मुनेत्र कळघम आणि समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांवरही निशाणा साधला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या या पक्षांवर त्यांनी महिलांविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मतसंख्या मिळाली नसली तरी लढा थांबणार नाही. देशातील 100 टक्के नारीशक्तीचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, असे म्हणत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केला. अंदाजे 60 वेळा काँग्रेसचे नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला. विविध महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने विरोध केल्याचे सांगत त्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायदा यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला.


