उन्हाच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे त्या-त्या दिवशी सकाळीच सात ते ११ वाजताच्या दरम्यान करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. आता देखभाल-दुरूस्तीसाठी फक्त सकाळी सात ते ११ वाजेदरम्यानच वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
उन्हाळ्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. या कामांचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच केले जाते. देखभाल-दुरूस्तीची कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असते. त्यानुसार सध्या सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
या कालावधीत वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असून, मोठी गैरसौय होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी सात ते ११ वाजेदरम्यानच करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.राज्यातील वीजयंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीच्या वेग देण्यात आला असून, ही कामे सकाळी लवकरच करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, पावसामुळे वीजपुरवठा खंडित होणे आणि वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येत असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले.
महावितरणच्या देखभाल दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आणि संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे व प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळवण्यात येणार असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
महावितरणचा मोठा निर्णय; आता सकाळी ७ ते ११ बत्तीगुल?
- Advertisement -


