अहिल्यानगर महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी

अहिल्यानगर: महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनीच महापालिकेच्या कारभाराबद्दल संतप्त भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या हलगर्जीपणामुळे विकासकामात अडथळे निर्माण होत आहेत. शहरातील ओढे-नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळत आहे. या अधिकाऱ्यांची राज्य सरकारकडे तक्रार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार जगताप म्हणाले, शहरातील विकास आराखड्यातील रस्त्यांच्या कामासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. काही रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत तर काही रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या नगररचना विभागाने वेळेत रेखांकन करून देणे व अतिक्रमण विभागाने अडथळे देऊन दूर करणे गरजेचे असतानाही संबंधित विभागाकडून हलगर्जीपणा होत आहे. त्यामुळे विकासकामात अडथळे निर्माण होत आहेत.

महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीचे कारभारामुळे कामे रखडत आहेत. रस्ते विकासासाठी आवश्यक असलेले रेखांकन वेळेत दिले जात नाही, अतिक्रमणे हटवली जात नाहीत, त्यामुळे ठेकेदारांना काम करताना अडचणी येतात. सुरू असलेली कामे अचानक थांबतात त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसतो. ठेकेदारांनी रेखांकन मिळाल्याशिवाय काम सुरू करू नयेत आणि काम सुरू केल्यानंतर ते अर्धवट सोडू नयेत. नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे विकासकामांना अडथळे निर्माण होत असल्याने त्यांच्याविरोधात शासनाकडे कारवाईची मागणी करणार आहे.शहरातील अनेक ओढे-नाले बुजवण्याच्या प्रकारांना काही अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात. शहरातील ओढे-नाले बुजवणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळत आहे. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही शासनाकडे करणार आहे. स्वतःची जबाबदारी झटकून एकमेकांवर दोषारोप करण्याचे काम काही अधिकारी करत आहेत. नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.शहरातील एकविरा चौक तिथे तपोवन रस्ता या काँक्रिटीकरणच्या कामाची पाहणी आमदार जगताप यांच्यासह महापौर ज्योती गाडे, सभापती दिपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, महेश तवले, सुनील त्रिंबके, ऋग्वेद गंधे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, किशोर डागवाले, अविनाश घुले, गणेश कवडे, महेश लोंढे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांनी केली. त्यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles