रस्त्याच्या दिरंगाईविरोधात खा. लंकेंचा उपोषणाचा इशारा
सावळीविहीर-नगर बायपास रस्ता कामाच्या विलंबामुळे लंके यांचा संताप
अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एमएच १६६० या महामार्गाच्या रूंदकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सुर उमटत असून या नाराजीची दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण आणि प्रकल्प अंमलबजावणी विभागास इशारा देत ११ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भातील निवेदनात खा लंके म्हणतात, सावळी विहीर किमी ८८.४०० ते अहमदनगर बायपास किमी १६३.४०० या ७५ किमी लांबीच्या फोर लेन महामार्ग रूंदीकरणासाठी भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि., देहरादून या कंपनीला ठेका देण्यात आला असून २१ मार्च २०२५ रोजी ठेका करार पार पडला होता. २९ एप्रिल रोजी सबंधित कंपनीस काम मंजुर होउनही आज अखेर कोणतेही काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही.
हा प्रकल्प भारतमाला योजनेअंतर्गत मंजूर असून या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. जिल्हयातील शेतकरी, विद्याथ, वाहनचालक यांना दररोज अपुऱ्या आणि धोकादायक रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूच्या घटनाही घडत आहेत असे लंके यांनी नमूद केले आहे.
प्रशासन आणि ठेकेदाराच्या निक्रियतेवर संताप
कामाची मंजुरी देण्यात आल्यानंतर दोन महिने उलटलेले असताना एकही यंत्र, मनुष्यबळ वा साहित्य तैनात न केले जाणे, हे प्रकल्पातील गंभीर निष्क्रियतेचे द्योतक असल्याची संतप्त भावना खासदार लंके यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. या स्थितीवर प्रतिक्रया देताना खा. लंके म्हणाले, दिवसेंदिवस नागरिकांच्या तक्रारी वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये असंतोष उफाळला आहे. काम तातडीने सुरू न झाल्यास हजारो नागरिकांसह मी स्वतः बेमुदत उपोषण करणार आहे.
११ जुलै पासून बेमुदत उपोषण
खासदार लंके यांनी आपल्या पत्रात राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण आणि प्रकल्प अंमलबजावणी विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही माहीती दिली असून ११ जुलै २०२५ रोजी सकाळी प्रकल्प संचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष
या प्रकल्पाच्या दिरंगाईबाबत खा. लंके यांनी ऑगस्ट २०२४ मध्येच केंद्रीय मंत्रयांना पत्र लिहून लक्ष वेधले होते. त्यावर मंत्रालयाचे सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी २९ ऑगस्ट रोजी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. यानंतर एक वर्षानंतरही प्रत्यक्ष काम सुरू न होणे हे गंभीर दुर्लक्ष असल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला.
तात्काळ प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, कामाची प्रगती व योजनाबध्द वेळापत्रक सादर करावे, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.


