केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने ९ जुलै रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील २५ कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. ज्यामुळे देशभरातील अनेक जीवनवाश्यक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्राच्या आर्थिक धोरणांविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी हा संप पुकारला आहे. तर ९ जुलैला होणाऱ्या भारत बंदमध्ये बँकिंग क्षेत्र सहभागी होणार असल्याचे, बँक कर्मचारी संघटनेने सांगितलेय.
देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचसोबत या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनांही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती आहे. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, रस्ते, बांधकाम, आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार असल्याने देशातील अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
संपाचा या सेवांवर होणार परिणाम
या देशव्यापी संपामुळे बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, राज्य परिवहन, कारखाने आणि इतर महत्वाच्या सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिध्दू यांनी सांगितले की, हा संप देशातील सामान्य सेवांवर मोठा परिणाम करेल. नागरिकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बँकिंग सेवांपासून ते सार्वजनिक वाहतूक आणि औद्योगिक उत्पादनापर्यंत सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम दिसून येईल.
भारत बंद दरम्यान या सेवा बंद राहणार?
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)
महामार्ग आणि रस्ते बांधकाम
सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.
काय सुरु राहणार?
खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे काम सुरू असेल.
रुग्णालये, वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.
खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा.
कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया याच्याकडे १७ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती. पण केंद्र सरकारकडून त्याला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्याचमुळे ९ जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे.


