नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील महसूल विभागात मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. योगिता आनंद भोये (वय ३८) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची खडक ओझर (ता. चांदवड) शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीच्या ताब्याबाबत काही व्यक्तींशी वाद निर्माण झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत महसूल विभागाला संबंधित जमिनीचा ताबा देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
यानंतर तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी योगिता भोये यांना न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून तक्रारदाराला जमिनीचा ताबा मिळवून देण्याचे निर्देश दिले. मात्र, या प्रक्रियेसाठी भोये यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. स्वतःसाठी आणि खडक ओझर सजाच्या तलाठ्यासाठी मिळून ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने नाशिक येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. नियोजितप्रमाणे तक्रारदाराने ५० हजार रुपयांची रक्कम देताच, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ छापा टाकून योगिता भोये यांना रंगेहात अटक केली.
या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात कडक संदेश गेला असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


