Tuesday, November 11, 2025

खळबळजनक दावा….आजी-माजी अधिकारी हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी , वेळ आली की तिकीट लावून दाखवू…

राज्यात गेल्या आठवडाभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत उत्तर दिले होते. सध्या सभागृहात हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी आहे ना ट्रॅप. नाना पटोलेंनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत बॉम्ब आणला होता असं समजतंय. पण नानाभाऊंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. ते गृहखात्यापर्यंत पोहोचवलंच नाहीय, असा टोला लगावतानाच कोणत्याही आजी-माजी मंत्र्याची हनी ट्रॅपची तक्रार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केलाय.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे देखील आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे. मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली, इतकं मोठं ते प्रकरण आहे. त्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल. ते तिकीट लावूनच आम्हाला चित्र दाखवावे लागेल. पण, त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल एवढा मोठा भक्कम पुरावा त्यात आहे, असा दावा त्यांनी केलाय.

दरम्यान, यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ज्या पद्धतीने मुख्यमंत्री धडधडीत विधानसभेत खोटे बोलले, असे वक्तव्य केले. त्या आईचे अश्रू सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री समजू शकत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी काल दिलेले भाषण हेच खोटे होते, हे स्पष्ट होत आहे. मी अनेकदा सांगितले आहे की, महाराष्ट्रातले काही वरिष्ठ अधिकारी, मंत्री या हनी ट्रॅपमध्ये आहेत. त्याचे केंद्रबिंदू नाशिक, ठाणे आणि मुंबई आहे.

महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण दस्तऐवज या हनी ट्रॅपमुळे असामाजिक तत्त्वांच्या हाती गेले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहे. महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. ती गोष्ट आम्ही विधानसभेच्या माध्यमातून सरकारला सांगत होतो. मी पेन ड्राईव्ह दाखवला त्यावेळेस अध्यक्षांनी मला नको नको नको, ते आपल्याकडेच ठेवा, असे म्हटले. त्यावेळेस माझ्याकडे पेन ड्राईव्ह मागितला असता तर मी देऊन टाकला असता. ते आम्हाला जाहीरपणे दाखवता येणार नाही. कारण, अनेक कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त होतील. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं कारण त्यांच्याजवळ देखील याबाबत माहिती असेल. पण. मुख्यमंत्री हे का लपवत आहे? महाराष्ट्राचे नुकसान का करत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles