केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन आणि मतदार संघ पुनर्रचना विधेयक मांडलं. पण पुरेस बहुमत नसल्याने हे विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र विरोधकांनी याच मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मोदी है तो मुमकीन है’ ही आता दंतकथा झाली, आता फारतर ‘ मोदी है तो नमकीन है’ असं म्हणता येईल. हे नमकीन नमकीन भाषण करतात, आणि त्यांचीच लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. जे बिल अमित शहांनी आणलं, ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय . दोन तृतीयांश मेजॉरिटी जमा करू शकत नाही, भारतीय जनता पक्षाकडे स्वत:चं बहुमत नाही. अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल, लोकसभेत आणलं , त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना असा काही नव्हता. तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत रहायचं, याशिवाय अमित शाह आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
बेकायदेशीर पद्धतीने विजय मिळवण्याच्या संदर्भातलं हे बिल होतं. डिलीमीटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी… महिलांच्या नावाखाली 850 जागा वाढवायच्या यापेक्षा दुसरा कोणताही हेतू नव्हता. या निमित्ताने देशामध्ये उत्तर वि.दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्ताने त्यांना पुरूष वि. महिला असा संघर्ष पेटवायचा होता. आम्हीच महिलांचे एकमेव तारणहार हा नॅरेटिव्ह त्यांना या निमित्ताने सेट करायचा होता असा आरोपी राऊतांनी केला.


