देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणाऱ्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये, म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनंतर 2000 रुपये, थेट बँक खात्यावर जमा होतात. यापूर्वीचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे 20वा हप्ता जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीस मिळेल, अशी अपेक्षा होती.
हप्त्याची घोषणा कधी होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतताच, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. योजनेसंदर्भातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आता केवळ शेवटची मंजुरी आणि अधिकृत अधिसूचना बाकी आहे.शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत आहे का, याची खात्री करून घ्यावी. अनेकदा आधार क्रमांक, बँक डिटेल्समधील चुका किंवा माहितीतील विसंगतीमुळे हप्ता अडकण्याची शक्यता असते.
असे तपासा यादीत नाव
१. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
२. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary List” वर क्लिक करा
३. राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरा
४. सबमिट केल्यानंतर सूचीमध्ये आपले नाव शोधा
असे तपासा Beneficiary Status
१. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary Status” वर क्लिक करा
२. आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाका
३. सबमिट केल्यानंतर आपल्या खात्यावर पैसे आले का हे पाहता येईल
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हे शेतकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल असून, त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती असणे अत्यावश्यक आहे.


